के. के.चा मृत्यू आणि समाजाचे आरोग्यभान.
भाग एक
लेखिका - डॉ वैशाली चव्हाण, सेक्रेटरी, भारतीय भूलशास्त्र संघटना
सातारा
कालची सकाळ उजाडली तीच आवडता गायक के के च्या अत्यंत अनपेक्षित व दुःखद मृत्यूच्या बातमीने.. रात्री उशिरा त्याच्या मृत्यूअगोदरचे दोन व्हिडिओ पाहिले. एकात तो अतिशय अस्वस्थ होऊन घाम पुसत होता व दुसऱ्यात त्याला त्याचा स्टाफ चालवत हॉस्पिटलमध्ये नेत होता. या दोन्हीं व्हिडिओबाबत एक डॉक्टर व एक भूलतज्ञ म्हणून मला अस्वस्थ वाटले.. आपल्या भारतीय समाजाबद्दल बोलायचे झाले तर आपल्याकडे एकूणच मेडिकल इमर्जन्सी याबाबत समाजाची जागृती फारच निराशाजनक आहे. त्याच्या कारणांच्या खोलात जाणे हा या लेखाचा हेतू नाही. तर अशा इमर्जन्सीमध्ये समाज म्हणून आपण काय करु शकतो हा आहे.
के के बाबत असे दिसते की कार्यक्रमादरम्यानच त्याला अस्वस्थ वाटले होते व प्रचंड घाम आलेला होता. त्यावेळी संयोजक असो वा त्याचा सपोर्ट स्टाफ असो कोणालाही हा हार्टअटॅक असू शकतो ही शंका सुद्धा आलेली दिसत नाही. त्याला स्वतःला असा त्रास झाल्यावर आपण कार्यक्रम थांबवून वैद्यकीय मदत घेणे ही आपल्या कलेशी , चाहत्यांशी केलेली प्रतारणा नसते हे समजले नसेल का? आपल्या well being पेक्षा आपले प्रोफेशनल असणे महत्वाचे वाटावे इतकी अटीतटीची परिस्थिती असेल का? हे प्रश्न आता त्याचबरोबरच विरून गेलेत...
खरं तर मध्यमवयीन व्यक्तीला अस्वस्थ वाटून प्रचंड घाम येणे हे हार्टअटॅकचे प्रमुख लक्षण असते. मग ती व्यक्ती वरवर कितीही हेल्दी दिसत असली तरीही! संयोजक अशा concert साठी प्रेक्षकांच्या सुरक्षिततेसाठी ( आग लागू नये, चेंगराचेंगरी होऊ नये इ.) उपाययोजना करत असतात. अशा ठिकाणी मुख्य परफॉर्मरलाच नव्हे तर त्याच्या टीममधील लोकांना किंवा अगदी प्रेक्षकांपैकी कोणालाही हार्ट अटॅक, फीट , दमा बळावणे, रक्तातील साखर धोकादायकरित्या कमी होणे इ सारखी मेडिकल इमर्जन्सी उद्भवलीच तर त्वरित उपचार मिळावेत यासाठी मेडिकल टीम असणे तर सोडाच पण त्याबाबत विचारसुध्दा केलेला दिसला नाही.
दुसरी गोष्ट कार्यक्रम संपल्यावर के के ला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी हॉटेलमध्ये नेले जिथे त्याची प्रकृती अजूनच बिघडली. त्याचा सपोर्ट स्टाफचे मेडिकल इमर्जन्सीबाबतचे अज्ञान किती महागात पडले.. हेही कमी पडले म्हणून की काय त्याला हाताला धरून चालवत नेले.. हे पाहून तर कोणताही मेडिकल डॉक्टर मनोमन हताश झाला असणार. अस्वस्थ वाटणे, प्रचंड घाम येणे ( अशा वेळी पेशंटचे कपडे घामाने भिजून जातात. ) , छातीत / पाठीत/ डाव्या हातात/ जबड्यामध्ये दुखणे, चक्कर येणे / दम लागणे अशा लक्षणांमध्ये पेशंटला कधीही चालवत नेऊ नये. स्ट्रेचर उपलब्ध नसेल तर खुर्चीवर बसवूनच वाहनातून नेले पाहिजे व हॉस्पिटलमध्ये ( शक्यतो आयसीयू मध्ये ) सुद्धा चाकाची खुर्ची/ स्ट्रेचर/ खुर्चीवर बसवूनच आत नेले पाहिजे. अन्यथा तो हार्टअटॅक जीवघेणा ठरू शकतो. हा साधा अवेअरनेस माणसांना नसावा ? फार वाईट वाटले.
या साऱ्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल मध्ये नेण्यापूर्वीच एखादी व्यक्ती collapse झाली म्हणजेच तिचे हृदय आणि श्वास बंद पडल्यास काय करावे याची माहिती तिथे उपस्थित असलेल्या कोणालाही असण्याची अपेक्षा करणेच गैर वाटते. म्हणजे प्रगत देशांमध्ये नागरिकांना कोणतीही मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाली तर तातडीने हृदयाला शॉक देणे , कृत्रिम श्वसन यंत्रणा सुरू करणे ते अगदी इमर्जन्सी angiography सारख्या उच्च सोयींनी सुसज्ज अँब्युलन्स, प्रशिक्षित व मुबलक स्टाफसह काही मिनिटांत उपलब्ध होऊ शकते. तेथील नागरिकांना अपघात, हार्टअटॅक, सर्पदंश, विजेचा धक्का, पाण्यात बुडणे इ. कोणत्याही कारणांनी व्यक्तीचे हृदय आणि श्वास बंद पडल्यास करण्याच्या प्रथमोपचाराचे शालेय वयापासून प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अँब्युलन्स येईपर्यंत तिथे सामान्य माणूससुद्धा अशा पेशंटचे हृदय चालू ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.
भारतात याबाबतीत असलेल्या निराशाजनक परिस्थितीवर नुसतेच खडे फोडण्यापेक्षा त्यावर इथल्या परिस्थितीत करता येईल असे तंत्र
Indian Resuscitation Council Federation (IRCF) ने विकसित केले आहे. यालाच 'जीवन संजीवनी 'असे म्हणतात! यामध्ये हृदय आणि श्वास बंद पडलेल्या व्यक्तीचे हृदय चालू ठेवण्यासाठी कोणतेही उपकरण / इंजेक्शन लागत नाही. लागतात फक्त तुमचे दोन हात व पेशंट चा जीव वाचवण्याची धडपड!
IRCF व Indian Society of Anaesthesiologists ( ISA) अर्थात् भारतीय भूलतज्ञ संघटना गेली 12 वर्षे भारतभर केवळ आपल्या दोन हातांच्या साहाय्याने बंद पडलेले ह्रदय कसे चालू करायचे याचे देशभरात मोफत प्रशिक्षण देते. आपल्या देशातील मेडिकल संसाधनांची कमतरता लक्षात घेता आपल्या देशातील परिस्थितीला उपयुक्त होईल असे हे प्रशिक्षण तयार केले आहे. यासाठी IRC व भारतीय भूलतज्ञ संघटना एकत्रित का आल्या असाव्यात? तर भूलतज्ञ हा ऑपरेशन थिएटर मध्ये भूल देण्याव्यतिरिक्त अशा प्रकारच्या इमर्जन्सी हाताळण्यात सुद्धा उत्तम पद्धतीने प्रशिक्षित असतो म्हणून!
या' जीवन संजीवनी 'ला Compression Only Life Support ( COLS) असे म्हणतात.
त्याविषयीची माहिती पुढील भागात!
*Resuscitation - रिससिटेशन व्यक्तीचे बंद पडलेले हृदय आणि श्वास चालू करण्याचे उपचार
#jointhelifesavingmovement #jointhelifesavingmovement #learncpr #savelives #CPR #COLS #BCLS #IRCF #AFAI #cardiacarrest #heartattack #myocardialinfarction #cardiacarrestvsheartattack #heartattackvscardiacarrest #basicfirstaid #firstaidsaveslives #firstaidmatters #anyonecansavelives #bystander
डॉ वैशाली चव्हाण,
सेक्रेटरी, भारतीय भूलशास्त्र संघटना
सातारा
(ही पोस्ट शेअर करायला परवानगीची मुळीच गरज नाही.)
Comments